सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बहुतांशी प्रमाणात रात्रीच्या चोऱ्या होत असतात मात्र भोर शहरात भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.ही घटना शुक्रवार दि.१३ सकाळी ९ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान संजयनगर येथील श्री स्वामी समर्थ नगरजवळ असलेल्या घरात घडली.याबाब घरमालक श्रीकांत लक्ष्मणराव भातलवंडे (वय ५०) यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत भातलवंडे व त्यांच्या पत्नी सकाळी घराला कुलूप लावून कामावर गेले होते.सायंकाळी कामावरून आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले २ लाख ८० हजार किमतीचे सोन्याचे दोन डोर्ले व दोन साखळ्या असलेले गंठण, ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याची दोन डोर्ले व १० सोन्याचे मनी असलेली पोत असे ३ लाख ६० हजाराच्या किमतीचे दागिने चोरले.याबाबत गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असल्याचे ठाणे अंमलदार डी. डी. खांडे यांनी सांगितले.
एकाच दिवशी दोन घरफोड्या
संजय नगर तसेच शिक्षक सोसायटी (विष्णू कृपा) येथे एकाच दिवशी घरफोड्या झाल्या.संजयनगरमधील घरफोडीत ३ लाख ६० हजारांचे दागिने चोरीला गेले.तर शिक्षक सोसायटीतील घरफोडीत दागिने अथवा रोकड नसल्याने शोधाशोध करूनही चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही.दुसऱ्या घरफोडीबाबत पोलिस ठाण्यात नोंद केली नाही.भरदिवसा शहरात झालेल्या या चोरींच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.