सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील आंबी पाटी येथील सृष्टी हॉटेलवर गहाळ झालेल्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या दोन तासात हस्तगत करण्यात सुपे पोलिस स्टेशनला यश आले.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, संदिप संभाजी वानखेडे ( रा. वोरार, मुंबई ) यांनी सुपे पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. वानखेडे हे जेजुरीचे देवदर्शन करुन मोरगावकडे येत होते. त्यावेळी जेजुरी - मोरगाव रस्त्यावरील सृष्टी हॉटेलवर जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी वॉश बेसिंगवर हात धुण्यासाठी हातातील एक तोळ्याच्या दोन अंगठ्या काढुन ठेवल्या असता त्या गहाळ झाल्या होत्या. याबाबत सुपे पोलिस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दिली होती.
सुपे येथील सपोनी मनोजकुमार नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे अंमलदार किसन ताडगे आणि महादेव साळुंके यांनी तपासाची चक्रे फिरवुन हॉटेलची सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्या सीसीटीव्ही फुटेजमधुन तक्रारदार यांच्याकडून माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारे संशयित तवेरा गाडी क्र. ( एमएच १४ एएम ३३३२ ) निष्पन्न करून गाडी मालकास संपर्क साधण्यात आला. सुपा पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांच्याशी चौकशी केली. यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेकडे कसुन विचारणा केली असता त्यांनी हॉटेल सृष्टी येथील वॉश बेसिन वर दोन अंगठ्या सापडल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे गहाळ झालेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या अंदाजे १० ग्रॅम वजनाच्या दोन तासात हस्तगत करण्यात सुपे पोलिसांना यश आले. यावेळी तक्रारदार संदीप वानखेडे यांच्याकडे त्या दोन अंगठ्या सुपुर्त करण्यात आल्या.
.........................