Phaltan Breaking l प्रशांत ढावरे l जिंतीच्या मुलाचे काळजमधून अपहरण....सहा तास अपहरणनाट्याचा थरार ... लोणंद पोलीसांनी केली मुलाची सुटका : पाचही आरोपी फरार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद येथील आयटीआय मधे शिकत असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे काळजच्या चौकात पाचजणांकडून अपहरण करण्यात आले. सहा तासांच्या अपहरणनाट्याच्या थरारानंतर लोणंद पोलीसांना रात्री पावणे अकराच्या दरम्यान मुलाची सुटका करण्यात यश आले आहे. 
याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणंद येथील आयटीआय मधे शिकत असलेला जींती तालुका फलटण येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलास मित्राच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना साखरवाडी येथील पाचजणांकडून संध्याकाळी पाच वाजता काळज येथील तडवळे फाट्याजवळ स्पीड ब्रेकरपाशी गाडी हळू झाल्याचा फायदा घेत अडवून जबरदस्तीने उतरवून दोन दुचाकीवरून आलेल्या पाचजणांकडून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले. 
सदर अपहरणाची माहीती मिळताच लोणंदचे सपोनि सुशील भोसले पोलीस हवा. विठ्ठल काळे, बापू मदने यांच्या टिमने अपहृताच्या शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी वाणेवाडी, मुरूम, कोऱ्हाळे, लाटे, खुंटे व होळ असा फिरत पोलीसांच्या भीतीने शेवटी खुंटे येथे संबंधित अल्पवयीन मुलास सोडून दिले. पोलीसांकडून तिथे पोहचत रात्री पावणेअकरा वाजता त्याचा ताबा घेतला.  लोणंद पोलिसात अपहृत मुलाचे वडील प्रमोद रनवरे यांनी अपहरण करणारे  मोन्या निंभोरे, अजय सपकाळ, प्रवीण मोहिते ,विजय सपकाळ, बंड्या जाधव सर्व राहणार साखरवाडी तालुका फलटण यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सदर पाचही आरोपी फरार असून लोणंद पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत.
जींती येथील अपहृत अल्पवयीन मुलाची आणि साखरवाडी येथील मुलांची २६ एप्रिल रोजी जींती येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बाचाबाची झाली होती. याच भांडणाचा राग मनात धरुन सदर अपहरणनाट्य झाले.
To Top