सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती विभागात दि. २८ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी, रात्रगस्त व वाहन तपासणी मोहिमेमुळे अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई उघडकीस आली आहे. पोलिसांच्या कडक दबावामुळे आरोपींनी ४७० किलो गांजा जळोची-पिंपळी रोड परिसरातील शेताच्या मोकळ्या रानात टाकून फरार होण्याचा प्रकार समोर आला आहे.
या जप्त गांजाची अंदाजे किंमत तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. संशयित वाहनांवर कडक नजर ठेवण्यात येत असतानाच अंमली पदार्थ वाहतूक करणारे आरोपी घाबरून गेले आणि मोठ्या प्रमाणात गांजा टाकून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी दोन मोठ्या ड्रममध्ये भरलेला एकूण ४७० किलो गांजा ताब्यात घेतला. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हा गांजा विक्रीसाठी बारामती परिसरात आणण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा अनर्थ टाळला. अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
