सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री म्हणून धुरा स्वीकारलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या पहिल्याच निर्णयामुळे सुपे भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरू व्हावे, अशी मागणी सुपे भागातील शेतकऱ्यांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे कामकाज पाहणाऱ्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तात्काळ सूचना देत आजपासूनच पाणी सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित हालचाली करून पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरू केले. यामुळे जोगवडी व मुर्टी गावातून पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली असून पुढील टप्प्यात सुपे भागातील इतर गावांतील शेतकऱ्यांनाही या पाण्याचा लाभ मिळणार आहे. शेतीला पाणी मिळाल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत तात्काळ निर्णय घेऊन मार्ग काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या या पहिल्याच निर्णयामुळे सुपे भागातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
