Beed News l बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई, लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकले जाळ्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बीड : प्रतिनिधी 
महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बीड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना एका शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार शेतकऱ्याला सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने याप्रकरणी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. दरम्यान, तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. कारवाई दरम्यान तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आला होता, त्यामुळे त्यांनी पैसे स्वीकारण्यास काही काळ टाळाटाळ केली. संशय आल्याने त्यांनी सावध पवित्रा घेतला असला, तरी एसीबीने अत्यंत कौशल्याने आवश्यक पुरावे संकलित केले आणि त्यांना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली. सध्या मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीकडून पुढील तपास केला जात आहे.
Tags
To Top