सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी भररस्त्यात एका २१ वर्षीय तरुणीचे तिच्या आई आणि भावासमोरच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित कुटुंबियांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकून हे कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून भिगवणच्या दिशेने जात होती. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. काही समजण्याच्या आतच आरोपींनी तिघांच्याही डोळ्यात मिरचीची पूड फेकली. यामुळे आई आणि भाऊ असहाय्य झाले असतानाच, आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसवून तिथून पोबारा केला.याप्रकरणी भिगवण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत झहीर हरून शेख आणि आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड) या दोन सख्ख्या भावांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच भिगवण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात धाव घेत संताप व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, बारामती विभागाचे अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. सध्या शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्ग आणि टोल नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण आहे. अपहृत तरुणीचा तातडीने शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
