सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
कोकणाला जोडणाऱ्या पाचवड ते खेड या राज्य महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या कामात ठेकेदाराकडून विशेष अशी काळजी घेतली जात नसल्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होऊ लागले आहेत.ठेकेदाराचा हलगर्जीपणा वाहनधरकांच्या जीवावर बेतू लागला आहे.
यातच आज सकाळी 11 च्या सुमारास मानकुंबरे पॉईंट जवळ एम एच १४ एम व्हि ७३०७ न रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीचा अंदाज न आल्यामुळे थेट रस्त्याच्या एका साईडला धडकून पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीतून चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.मात्र वारंवार याठिकाणी अपघात होत असल्याने ठेकेदाराच्या कामाबद्दल वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी खडीचे ढीग असल्याने वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.यातच रस्त्यावरून जात असताना मोठ्या प्रमाणात धुळीचे लोटतयार होत आहेत.यात रस्ता नक्की कुठे आहे हे शोधत वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर ठेकेदाराकडून पाणी मारले जात नसल्याचे नागरिक तसेच वाहनधारकांमधून बोलले जात आहे.यामुळे प्रवास करताना दुचाकीसह सर्वच वाहनधारकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.ठेकेदाराकडून यावर योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे.
अशी मागणीही वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.तसेच दिवसाढवळ्या रस्त्यावर पाणी मारण्याच्या नावाखाली डबडेवाडी येथून वाहणाऱ्या धोम उजवा कॅनॉलमधून खुलेआमपणे पाणी उपसा केला जात असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी मी माझ्या भिवडी येथील मेडिकल दुकानावरून घरी जात असताना रस्त्याच्या कामावर पाणी मारण्यासाठी असणारा टँकर रस्त्याच्या मधोमध ऊभा करून टँकरवरील चालक हा झाडाखाली जाऊन झोपला होता. टँकर मधून काही प्रमाणात पाणी लिकेज होत होते.यामुळे एक दुचाकीस्वार घसरला आणि त्याची थेट धडक माझ्या दुचाकीला बसली.यात दोघांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.सदर घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती संबंधित ठेकदाराकडे कॉलद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला असता ठेकेदाराकडून योग्य असा प्रतिसाद देण्यात आला नाही याउलट ठेकेदाराकडून मरगुरीची भाषा मला वापरण्यात आली.
