सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे : राहुल वाघोले
श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे गुलालाची उधळण करत बारा दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता मानकरी समस्त जमदाडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपन करून पारंपरिक मारामारीने ( रंगाचे शिंपण ) यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ' सवाई सर्जाचा' जयघोष करत पालख्यां व वीस गावाच्या मानाच्या काट्यावर फुलांची उधळण करत यात्रेची सांगता करण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य विश्वस्त मोहनराव रावसो धुमाळ यांनी सांगितले.
' मारामारी' हा यात्रेचा मुख्य दिवस असून या निमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली दुपारी बारा वाजता धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काट्या ढोल ताशा सह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व सर्व मानकरी मंदिरात आले.
मानाच्या पालख्या व काट्यांच्या मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळ वाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, दादा बुरुंगले यांची भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली.मृगाचे पाणी तीन खंडात पडेल चौथ्या खंडात आले आले गेले गेले राहील, आश्लेषा मघा दोन खंडात पडेल, उत्तरा-पूर्वा चार खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, हत्तीचे पाणी तीन खंडात पडेल, गाईगुरे शेळी मेंढी यांचे मागील रोगराई हटलेली आहे, मनुष्याच्या मागे साधारण आटापिटा राहील अशाप्रकारे भाकणूक सांगण्यात आली. भाकणूकी नंतर दुपारी दीड वाजता देवाचे मानकरी समस्त जमदाडे यांच्यामार्फत देवाला नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपन करण्यात आले यावेळी फुलांची उधळण करण्यात आली.एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व पालख्या आपापल्या स्थळी जाऊन विसावल्या.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी स्वच्छ पाण्याचे पाणी, दर्शनरांगा, तीन ठिकाणी वाहनतळ, स्वयंसेवक, मंदिर परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, तसेच महिलांसाठी जोगेश्वरी कक्ष, सासवड पोलिस स्टेशनच्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सल्लागार मंडळ, यात्रा नियोजन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
