सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने राजगड तालुक्यात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तब्बल १४ वर्षांनंतर तालुक्याची सत्ता आपल्या ताब्यात घेत राष्ट्रवादीने भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का दिला आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या चारपैकी तीन जागांवर तसेच दोन्ही जिल्हा परिषद गटांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. विंझर गटातून अमोल नलावडे तर वेल्हे बुद्रुक गटातून तानाजी मांगडे यांनी विजय मिळवला. मांगडे यांची ही पहिली टर्म असली तरी अमोल नलावडे यांनी यापूर्वीही प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या पत्नी वसुधा नलावडे २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या, तर अमोल नलावडे २०१७ आणि २०२६ मध्ये निवडून येत दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत.
अमोल नलावडे यांना जिल्हा परिषद प्रशासनाचा दांडगा अनुभव, शासकीय योजनांची सखोल माहिती, व्यापक जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण समाजकार्य यामुळे ओळखले जाते. त्यामुळेच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राजगड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. तालुक्यातील जनता, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने ही मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत ७३ पैकी तब्बल ५२ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत राजगड तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळतो की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
