सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
श्रीगोंदा : प्रतिनिधी
आनंदाचे वातावरण क्षणार्धात शोकात रूपांतरित झाले. लग्नाची बोलणी करून, तारीख निश्चित करून आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि भावी नवरदेवावर काळाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच झडप घातली. नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारात मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मालमोटार आणि इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक तरुणासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
नितीन कोकाटे (चालक व भावी नवरदेव, रा. काष्टी)
गजानन जनार्धन पायधन (वय ४७, रा. मळतूर, जि. अकोला) दुर्पा गजानन पायधन (वय ३६, रा. मळतूर, जि. अकोला)वैभव गजानन पायधन (वय १९, रा. मळतूर, जि. अकोला) या अपघातात करण गजानन पायधन (वय १३) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायधन कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील असून ते श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे कामाला होते. चालक नितीन कोकाटे यांच्यासह हे कुटुंब लग्नाच्या बोलणीसाठी अकोल्याला गेले होते. सोमवारी रात्री अकोलाहून चिंभळेकडे परतत असताना, कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकने (MH 12 DT 4633) इको कारला (MH 16 DG 8208) जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकने कारला तब्बल ५० फूट फरफटत नेले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रक चालक चुकीच्या बाजूने (रॉंग साईड) भरधाव वेगाने येत होता. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज बेलवंडी पोलिसांनी वर्तवला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी नगर शिवारातून ताब्यात घेतले आहे.
नितीन कोकाटे आणि गजानन पायधन हे एकत्र कामाला होते. पायधन यांच्या नात्यातील मुलीशी नितीनचे लग्न ठरले होते. २२ एप्रिल ही विवाहाची तारीख निश्चित करून हे सर्वजण परतत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ज्या घरात सनई-चौघड्यांचे वेध लागले होते, तिथे आता शोककळा पसरली आहे.
