सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन १५ वर्षीय मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडीओ व फोटो काढून ते प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी युवकास न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. घटना १० सप्टेंबर २०२३ मधील आहे.
या प्रकरणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी वसीम अकबर हुसेन रजा (वय २९) यास बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) व आयटी कायद्यांतर्गत दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसमवेत राहत होती. आरोपीने ती घरात एकटी असताना घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत मोबाईलवर व्हिडीओ व फोटो काढून ते प्रसारित करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या आईने पाचगणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानंतर पोक्सो कायदा व आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी करून दोषारोपपत्र वाई जिल्हा न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील दयाराम पाटील व महेश यू. शिंदे, तसेच फिर्यादीतर्फे विशेष वकील दिनेश धुमाळ व भारती कोरवाल यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व वाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाने प्रभावी कामगिरी केली. पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, न्यायालयीन प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस अंमलदार भुजंगराव काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव पांब्रे, अविनाश डेरे, पोलीस अंमलदार किर्तीकुमार कदम, सुधाकर सपकाळ, हेमा कदम, प्रितम नाळे, सोमनाथ कुंभार यांनी सहकार्य केले.
