सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी स्वतःचा पुरेसा ऊस आहे. अन्य कारखान्यांचा ऊस संपल्याने ते सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आहेत. विशेष म्हणजे सख्खा शेजारी असलेल्या माळेगाव कारखान्याने अलीकडच्या अनेक वर्षात प्रथमच सगळे संकेत मोडीत काढत सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात दहा-बारा टोळ्या पाठवल्या असून बराच ऊस तोडून नेला जात आहे. यामुळे निकोप स्पर्धेला प्रथमच गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात साखर कारखान्याची संख्या वाढली तर काहींनी आपले विस्तारीकरण केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणि जिल्ह्या शेजारील सातारा, अहिल्यानगर भागातील कारखाने पुणे जिल्ह्यात ऊस पळवत आहेत. अशात जिल्ह्यातील घास वाढवलेल्या कारखान्यांचीही अधिकाधिक गाळपसाठी स्पर्धा सुरू आहे. सोमेश्वर कारखान्याने मागील काही वर्षात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमा राबवून, सिंचन योजना आणून ऊस क्षेत्र वाढविले. आपला ऊस बघून पुरेसे विस्तारीकरण केले. आताच्या हंगामात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम चालेल आणि चौदा लाख टन गाळप होईल असे उद्दिष्ट आहे. सोमेश्वरची पहिली उचल टनाला ३३०० रुपये आहे आणि अंतिम दर उच्चांकी असण्याचा संकेत आहे. मात्र ऊसतोड करण्यासाठी घाई झालेले जिराईत भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात माळेगाव कारखान्यास ऊस देऊ लागले आहेत. मोरगाव, सुपे, जेजुरी या पट्ट्यात माळेगावने आतापर्यंतचे संकेत झुगारून विना परवानगी टोळ्या, वाहने टाकली आहेत. त्यामुळे सोमेश्वरचे व्यवस्थापन नाराज झाले आहे.
याबाबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती हे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशके वर्षे काम करतात. त्यांच्यात काही अलिखित करार व काही संकेत असतात. त्यानुसार सोमेश्वर व माळेगाव ने परवानगी किंवा करार नसताना एकमेकांचा ऊस नेऊ नये असे समान धोरण आहे. स्पर्धा दराची, उताऱ्याची, गाळपाची असावी पण ती निकोप असावी अशी परंपरा आहे. परंतु माळेगावच्या काही काही टोळ्या कार्यक्षेत्रात ऊस तोडत आहेत.
---------------------
सोमेश्वर कारखाना १ फेब्रुवारीपासून पहिली उचल टनाला ३४०० रुपये तर १ मार्चपासून ३५०० रुपये प्रतिटन देणार आहे, शिवाय अंतिम दर दिवळीला उच्चांकी दिला जाणार आहे, असे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले
