Baramati Breaking l बारामती तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ..! होळ गावठाणात एकाच रात्री तीन घरे फोडली ! रोख रकमेसह सोने लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील होळ गावठाण परिसरात काल मध्यरात्री चोरट्यांनी दहशत माजवत एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरी केली. यामध्ये सुमारे ३७ हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक तोळा सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना दि. १६ च्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खिडकीतून घरात प्रवेश करून हिसकावले मंगळसूत्र
चोरट्यांनी मयूर भानुदास पवार यांच्या घराला लक्ष केले. चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करत यावेळी त्यांच्या आई झोपेत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पवार कुटुंबीय भयभीत झाले आहेत.
कपाटातील रोख रकमेवर डल्ला
दुसरी घटना आशाबाई करचे यांच्या घरात घडली. चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ३५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. तसेच पांडुरंग यशवंत भूमकर यांच्या घरातूनही चोरट्यांनी २ हजार रुपये रोख चोरून नेले.
एकुण ३७ हजार रोकड आणि १ तोळा सोने चोरीला
मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही ठिकाणच्या घरफोडीमध्ये चोरट्यांनी एकूण ३७ हजार रुपये रोख आणि १ तोळा सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
To Top