सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे सोमवार (दि. १६ मार्च २०२६) रोजी अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने “लैंगिक छळाच्या विरोधात जागरूकता व प्रतिबंध” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सुर्यवंशी यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते वृक्ष संजीवनी देऊन व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. सुप्रिया विशाल बर्गे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना पोश (POSH) कायदा तसेच कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधातील कायदेशीर तरतुदी, तक्रार प्रक्रिया आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. बनसोडे, सर्व महिला प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या केंद्र कार्यवाहक प्रा. सुनीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. जयश्री भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. दीप्ती भोईटे यांनी वक्त्यांचे आभार मानले.
या व्याख्यानासाठी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सचिव भारत खोमणे यांचे मार्गदर्शन लाभले.
