सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दि. २८ फेब्रुवारी रोजी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य शेतकऱ्यांची प्रगती कशी साधता येईल, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने (KVK Baramati) या आधुनिक तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाचे संशोधन समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. योगेश फाटके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "हे AI आधारित तंत्रज्ञान भविष्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याद्वारे अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होणार असून, सध्या उसासाठी वापरले जाणारे हे तंत्रज्ञान लवकरच इतर पिकांसाठीही उपलब्ध होणार आहे. त्यासंबंधीचे संशोधन पूर्ण झाले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देत विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम दादा जगताप, उपाध्यक्ष मिलींद कांबळे, सचिव भारत खोमणे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर व सर्व संचालक मंडळाने कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. बनसोडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही. डी. थोपटे, प्रा. डॉ. वाय. बी. गायकवाड आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी भांडवलकर यांनी केले, तर प्रा. जयश्री भोसले यांनी आभार मानले.
