Baramati Election l बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठिंबा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत घातलेल्या विकासाच्या गतीला खंड पडू नये आणि तालुक्यातील सामाजिक एकोपा अबाधित राहावा, या उद्देशाने यशवंत सेनेने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, उद्योजक संग्राम सोरटे, दत्ता माळशिकारे आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीत पोटनिवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला, अशी माहिती प्रा. दांगडे पाटील यांनी दिली.
प्रा. दांगडे पाटील म्हणाले की, बी. के. कोकरे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सेना ही धनगर समाजाला एन.टी. आरक्षण मिळवून देणारी नोंदणीकृत संघटना आहे. समाजाच्या एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
बारामतीच्या विकासकामांमध्ये तसेच सहकार, पणन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियुक्त्यांमध्ये धनगर समाजाला वेळोवेळी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी यशवंत सेनेने सुनेत्रा पवार यांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर, सचिव नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाबा भोजने, दिलीप गडदे, गोविंद नरुटे आदींच्या राज्य कार्यकारिणीने ठराव मंजूर करून बारामती मतदारसंघात प्रचार बैठका घेण्याचे जाहीर केले आहे.
To Top