Indapur News l शिवकृपा सोसायटीवर अरविंद जगताप यांचे निर्विवाद वर्चस्व; १३ पैकी ११ जागांवर मारली बाजी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या डाळज क्रमांक २ येथील 'शिवकृपा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित'च्या निवडणुकीत संस्थापक अरविंद जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. 
या निवडणुकीत जगताप यांच्या पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकून संस्थेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, तर विरोधी पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.या निवडणुकीत एकूण १३ जागांपैकी दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, ज्यामध्ये दोन्ही पॅनलचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. 
उर्वरित ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये अरविंद जगताप यांच्या पॅनलने १० जागांवर विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. विरोधी पॅनलला निवडून आलेल्या एका जागेसह एकूण दोन जागा मिळाल्या आहेत.विशेष म्हणजे, या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या प्रचार पत्रकांवर माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोटो होते. मात्र, ही निवडणूक पक्षविरहित असल्याने मतदारांनी विकासकामांना प्राधान्य देत संस्थापक अरविंद जगताप यांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची असल्याने भिगवण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवल्याने निवडणूक शांततेत पार पडली. अरविंद जगताप यांच्या या विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे.
To Top