सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
फलटण-लोणंद मार्गावरील काळज (ता. फलटण) गावच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांत शेतकरी पती-पत्नीसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनांमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
कारच्या धडकेत शेतकरी दांपत्य जागीच ठारपहिली घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुना डोंबाळवाडी फाटा येथे घडली. काळज येथील रहिवासी बाळू तुकाराम गाढवे (वय ५५) आणि पुष्पा बाळू गाढवे (वय ५०) हे पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून (MH 11 CM 7268) शेताकडे जात होते.
रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने आलेल्या कारने (MH 11 DU 9128) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक संभाजी जिनदास झिमल (रा. गंगोती, ता. माण) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ॲड. मल्हारी गाढवे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रस्ता ओलांडताना पादचाऱ्याचा मृत्यूदुसरी घटना शनिवारी सायंकाळी ७:३० वाजता काळज येथील श्रीनाथ अकॅडमीसमोर घडली. आप्पा तात्या येळे (वय ६२, रा. डोंबाळवाडी) हे रस्ता ओलांडत असताना लोणंदकडून फलटणकडे जाणाऱ्या कारने (MH 12 SE 7986) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी नाना बबन येळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक ज्ञानेश्वर शशिकांत ठोंबरे (रा. ठोंबरेवाडी, ता. खटाव) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
