Baramati News l वडिलांचा गॅस शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय : करंजेपुलचा रमजान शेख पीएसआय बनला, राज्यात २८५ वा क्रमांक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
घरची परिस्थिती हलाखीची, वडील हातावरचे पोट भरण्यासाठी मिक्सर दुरुस्तीचे काम करतात, अशा प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर रमजान बाळाभाई शेख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विभागीय पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. कोणत्याही खाजगी क्लासविना रमजान यांनी राज्यात २८५ वी रँक मिळवत पीएसआय पदाला गवसणी घातली आहे.

मूळचे करंजेपुल येथील रहिवासी असलेल्या रमजान शेख यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले. त्यांनी बी.ए. (मराठी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २०१७ मध्ये त्यांची राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. ७, दौंड येथे निवड झाली होती. ४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खात्यांतर्गत पीएसआय परीक्षेचा मार्ग निवडला. २०२२ च्या परीक्षेत केवळ ५ गुणांनी हुलकावणी मिळाल्यानंतर खचून न जाता त्यांनी २०२३ च्या जाहिरातीनुसार पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि आज यशाला गवसणी घातली. रमजान यांनी या परीक्षेत ४०० पैकी ३६० गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, त्यांनी मैदानी चाचणीत १०० पैकी १०० गुण मिळवण्याचा पराक्रम केला, तर मुख्य परीक्षेत ३०० पैकी २६० गुण प्राप्त केले. आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात लाखो रुपये खर्च करून कोचिंग लावले जाते, मात्र रमजान यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता 'सेल्फ स्टडी'वर भर दिला. विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. या प्रवासात विवेकानंद अभ्यासिकेचे संस्थापक गणेश सावंत यांचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरले.

आपल्या मुलाच्या या यशाबद्दल बोलताना त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. अत्यंत गरिबीत मुलांना शिकवल्याचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला एका पोलीस शिपायाचा उपनिरीक्षक पदापर्यंतचा हा प्रवास सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
To Top