सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील घिसर येथे हळदी समारंभ उरकून परत येत असताना मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यांना वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घिसर येथील नवरदेव संकेत शिंदे व नवरी संध्याराणी धिडले यांचा विवाह आज संपन्न होणार आहे. विवाहपूर्व पारंपरिक विधीनुसार जुगाई देवी मंदिरात हळद लावण्यासाठी सकाळी सुमारे दहा वाजता नवरा-नवरी व नातेवाईक गेले होते. हळदीचा समारंभ पार पडल्यानंतर सर्वजण पायवाटेने परतत असताना जंगलातील झुडपांमध्ये लपलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच घबराट उडाली. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी लोकांनी सैरावैरा पळ काढला. लग्नासाठी आलेल्या वाहनांच्या मदतीने जखमींना तत्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस पाटील सुनील धिडले यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले की, या घटनेत सहा पुरुष व तीन महिलांसह एकूण नऊ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.
