सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील पंचाळे-शहा रस्त्यावरील शिंदेवाडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास काळाने भीषण घाला घातला. जागरण-गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या कुटुंबाच्या पिकअपला आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपला आग लागून नवविवाहित दाम्पत्यासह चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचाळे येथील नवले कुटुंब कार्यक्रम आटोपून आपल्या पिकअप (एमएच १५/जेसी ६३३३) मधून घरी परतत होते.
खाडे वस्तीलगत समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच १४/एमटी ३८३९) पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आयशरने पिकअपला सुमारे १०० फूट ओढत नेले. या घर्षणामुळे पिकअपने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत खालील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे शुभम गणेश नवले (वय २१) - नवविवाहित पती, रिंकू शुभम नवले (वय १९) - नवविवाहित पत्नी, मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (वय ६८) - आजी, किरण रवींद्र मोरे (वय २३) - पिकअप चालक
एकाच चितेवर तिघांचा अंत्यविधी
या अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की, आगीत शुभम, रिंकू आणि चालक किरण यांचे मृतदेह कोळसा झाले होते. पंचाळे येथील स्मशानभूमीत या तिघांवर एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आला, तर मीराबाई गांगुर्डे यांच्यावर स्वतंत्र संस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नवले आणि मोरे कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
अपघातात सुनीता नवले, सचिन नवले, दिव्या नवले, समीक्षा गांगुर्डे, अदिती आहेर, आरती आहेर आणि अवघ्या दोन वर्षांचा देवांश मोरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आयशर चालक प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
•दुखाचा डोंगर-
अवघ्या काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या शुभम आणि रिंकू यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नियतीच्या या क्रूर खेळामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
