Ratnagiri News l मुलाला वाचवताना वडिलांची जीवाची बाजी, पण काळाचा घाला; गावखडी समुद्रात बुडून १३ वर्षीय मुलाचा अंत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
रत्नागिरी : प्रतिनिधी 
शाळेला सकाळची सुटी असल्याने कुटुंबासोबत समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. श्रेयश सागर गोसावी (वय १३, रा. मेर्वी-मांडवकरवाडी, मूळ रा. वाळवा, सांगली) असे मृत मुलाचे नाव आहे. आपल्या दोन मुलांसह पुतण्याला बुडताना पाहून वडिलांनी जिवाची बाजी लावत दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र श्रेयशला वाचवण्यात त्यांना अपयश आले.
 मिळालेल्या माहितीनुसार, सागर मोहन गोसावी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील असून ते सध्या मेर्वी येथे भंगार व्यवसाय करतात. शुक्रवारी (१० एप्रिल) त्यांचा मुलगा श्रेयश याची शाळा सकाळी असल्याने तो लवकर घरी आला होता. दुपारी दीडच्या सुमारास सागर गोसावी हे श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास मुले समुद्राच्या पाण्यात खेळत असताना अचानक लाटांचा अंदाज न आल्याने ती खोल पाण्यात ओढली जाऊ लागली. मुले गटांगळ्या खात असल्याचे पाहून सागर गोसावी यांनी तातडीने समुद्रात उडी घेतली. त्यांनी धाडसाने मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर ते पुन्हा श्रेयशला वाचवण्यासाठी धावले, मात्र तोपर्यंत श्रेयश लाटेसोबत खोल पाण्यात बेपत्ता झाला होता.

 घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील, पूर्णगड सागरी पोलीस आणि ग्रामस्थांनी बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली. मात्र, शुक्रवारी त्याचा शोध लागू शकला नाही. अखेर शनिवारी (११ एप्रिल) सकाळी ८ वाजता श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावरील सुरूच्या बनाजवळ तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठवला.

 श्रेयश हा पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर येथे सहावीत शिकत होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच शाळेत शोककळा पसरली. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवली. श्रेयशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी वाळवा-तांदूळवाडी (जि. सांगली) येथे नेण्यात आले असून, तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
To Top