सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत १८ मार्च रोजी कृष्णा नदी पात्रात एका चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना सातारा पोलिसांनी एका अत्यंत निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. केवळ संशयापोटी एका नराधम बापानेच आपल्या पोटच्या मुलाचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मयत चिमुकल्याचे नाव सिद्धार्थ आरेकरी असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावचा रहिवासी होता. त्याचा बाप मल्लिकार्जुन आरेकरी याला त्याचे मित्र "सिद्धार्थ तुझा मुलगा नाही, तो तुझ्यासारखा दिसत नाही" असे म्हणून सतत चिडवत असत. या टोमण्यांमुळे मल्लिकार्जुन आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि त्यांच्यात सातत्याने वाद होऊ लागले. १६ मार्च रोजी मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, असे खोटे सांगून मल्लिकार्जुनने सिद्धार्थला विजापूरहून साताऱ्यातील उंब्रज येथे आणले. तेथून त्याने त्याला शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी नेले. निर्जन स्थळी संधी साधून त्याने चिमुकल्या सिद्धार्थला जिवंतपणे नदीत फेकून दिले
विजापूर पोलिसांनी आता या नराधम बापाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात आणि कर्नाटक सीमाभागात मोठी खळबळ उडाली आहे.
