सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे घडली आहे. सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कराड) रेल्वे स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी तांत्रिक शक्कल लढवून रेल्वे थांबवली आणि अवघ्या २५ मिनिटांत लूटमार करून पसार झाले.
दरोडेखोरांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या ही चोरी केली. त्यांनी शेणोली स्टेशन हद्दीतील वरच्या सिग्नलची वायर कट केली होती, तर खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधले होते. सिग्नल मिळत नसल्याने आणि काहीतरी तांत्रिक धोका असावा या शंकेने मोटरमनने गाडी थांबवली. हीच संधी साधून तीन चोरट्यांनी गाडीवर हल्ला चढवला. गाडी थांबल्यानंतर दरवाजात आणि खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना चोरट्यांनी लक्ष्य केले. गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा ऐवजी चोरट्यांनी हिसकावून घेतला. अंदाजे २० ते २५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. सिग्नल का मिळत नाही हे पाहण्यासाठी शेणोली व भवानीनगर रेल्वे स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सिग्नलवरील कापड काढून यंत्रणा पूर्ववत केल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. पहाटे पावणे तीनच्या सुमारास गाडी कराड स्टेशनला पोहोचल्यावर प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलीस आणि मिरज रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुणे, सोलापूर आणि मिरज येथून तीन श्वान पथकांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, अद्याप चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुभाष मुंढे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
