सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दौंड : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) मलठण शाखेतील एका कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मलठण ता. दौंड येथील शेतकरी भीमराव विठोबा पांढरे यांनी कर्ज अर्जातील त्रुटी आणि कामकाजाबाबत संबंधित बँक कर्मचाऱ्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती.
याचाच राग मनात धरून बँक कर्मचारी अक्षय आटोळे याने दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायतीसमोर पांढरे यांना गाठले. व्हायरल व्हिडिओमध्ये आटोळे हा शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण करताना आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शेतकरी (भीमराव पांढरे) तक्रार केल्याचा राग धरून कर्मचाऱ्याने भररस्त्यात गाठून मारहाण केली. बँक कर्मचारी (अक्षय आटोळे) कर्ज अर्जात त्रुटी निघाल्याने पांढरे यांनी बँकेत येऊन शिवीगाळ केली आणि फोनवर धमक्या दिल्या.
बँक कर्मचाऱ्याच्या या मुजोर वर्तणुकीमुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "बँकेचा पगार घेणारा कर्मचारी अन्नदात्यावर हात उचलण्याची हिंमत कशी करू शकतो?" असा सवाल उपस्थित केला जात असून, संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी भीमराव पांढरे आणि अक्षय आटोळे या दोघांनीही एकमेकांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
