सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली पंचायत समितीच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच मासिक सभेत गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे दिलगिरी व्यक्त करावी लागली. सदस्यांच्या प्रश्नांवरून वातावरण तापले असून उपसभापती गोरख महाडीक यांनी धुमाळ यांना “व्यवस्थित बोला” अशी तंबी दिली, तर सदस्य अतिष कदम यांनी चौकशीची मागणी केली.
सभेच्या सुरुवातीला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजनेत केळघर, कुसुंबी मुरा आणि सावली शाळांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्यानंतर सदस्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांवर होत असलेल्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी धुमाळ यांनी “पुरावा द्या, मोगम बोलू नका” असे वक्तव्य केल्याने सभागृहात नाराजी पसरली. उपसभापती महाडीक यांनी “सदस्यांशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही” असे सांगत त्यांना फटकारले. सदस्य अतिष कदम यांनीही यावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धुमाळ यांनी दिलगिरी व्यक्त केली.
सभेत आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम यांसह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जवळवाडी येथे आरोग्य उपकेंद्रासाठी जागेचा प्रश्न, सायगाव व कुडाळ आरोग्य केंद्रांतील सुविधा, तसेच पाचवड–मेढा रस्त्यावरील धुळीचा त्रास या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच केळघर येथे सार्वजनिक शौचालयासाठी जागेचा प्रश्न, एसटी बस वेळेवर सोडण्याबाबत सूचना, सौरऊर्जा वाहिन्या अखंडित सुरू ठेवण्याची मागणी यावरही सदस्यांनी आवाज उठवला.
सभापती सौरभ शिंदे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.
•अपघातांवर उपाययोजना करण्याची मागणी
सातारा–महाबळेश्वर मार्गावर वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या मार्गावर आतापर्यंत ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सभापती सौरभ शिंदे यांनी केली.
