सोमेश्वर रिपोर्टर टीम----
फलटण : प्रतिनिधी
तालुक्यातील दवळवाडी परिसरात सोशल मीडियावरील वादातून १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मृत तरुणाचे नाव सोमनाथ संदीप जाधव (वय १८, रा. मि. मिऱ्याचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे असून, त्याच्यावर चौघांनी लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी आदित्य विजय शिंदे (वय २३), तेजस उर्फ विक्या शिवाजी लोखंडे (वय २४), प्रद्युम्न उर्फ पिट्या पांडुरंग लोखंडे (वय २२) (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात, मृत सोमनाथ हा एका अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलद्वारे सोशल मीडियावर चॅटिंग करत असल्याच्या कारणावरून आरोपींनी संतापाच्या भरात हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेप्रकरणी गुन्हा क्र. १९०/२०२६ नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी आदित्य शिंदे याला न्यायालयाने दि. १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित आरोपींना दि. १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले होते.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
