Satara News l कराड बसस्थानकावरील १४ लाखांची दागिने चोरी उघड; ६० वर्षीय महिला चोर साताऱ्यातून जेरबंद!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
चिपळूण : प्रतिनिधी 
कराड बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या पर्समधून सुमारे १४ लाख ६१ हजार ८५० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत महिला चोराला जेरबंद करण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. मंगल ऊर्फ शोभा अंकुश साठे (वय ६०, रा. भाटघर, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चिपळूण येथील रहिवासी वैष्णवी विश्वनाथ शिंदे (वय ४७) या ११ एप्रिल रोजी दुपारी ३:२० च्या सुमारास कराड बसस्थानकावरून तिवरे येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत संशयित शोभा साठे हिने शिंदे यांच्या खांद्यावरील पर्समधून दागिन्यांची छोटी पर्स अत्यंत शिताफीने लंपास केली. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चिपळूण पोलिसांनी तातडीने तपास चक्रावली फिरवली. बसस्थानक परिसरातील कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. मिळालेल्या माहितीवरून संशयित महिला सातारा जिल्ह्यातील भाटघर येथील असल्याचे निष्पन्न झाले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भाटघर येथे पोलिसांनी सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयित महिलेच्या घराची झडती घेतली असता, चोरीला गेलेले सर्व दागिने घरामध्ये सापडले. पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सुमारे १४.६१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलीस अधिकारी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेंगडे, तपास अधिकारी ओम आघाव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

•सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आम्ही संशयित महिलेचा माग काढला. संशयिताकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यात तिचे आणखी कुणी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.                                                                                             -चिपळूण पोलीस
To Top