Satara News l रायगाव फाटा येथे भारत गॅसच्या एमडीपीई पाईपचा साठा जळून खाक; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
लिंब (ता. सातारा) येथील ढगेवाडी परिसरातील रायगाव फाटा येथे मंगळवारी दुपारी भारत गॅस पुरवठ्यासाठी साठवून ठेवलेल्या एमडीपीई (MDPE) पाईपच्या साठ्याला अचानक भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० ते २२ पाईपचे बंडल जळून खाक झाले असून, अंदाजे ४ ते ४.५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ढगेवाडी परिसरातील कोलदरा शिवारात एम. पी. इंजिनिअरिंग (मुंबई) या खासगी कंपनीचे गोडाऊन आहे. या ठिकाणी गॅस पाईपलाईनच्या कामासाठी लागणाऱ्या फायबर पाईपचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी अज्ञात कारणाने या साठ्याला आग लागली. पाईप प्लॅस्टिक/फायबरचे असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे लोट इतके मोठे होते की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरूनही हे दृश्य स्पष्ट दिसत होते. ज्या ठिकाणी आग लागली होती, त्याच्या अगदी जवळच एक मोबाईल टॉवर आहे. आगीच्या ज्वाळा टॉवरपर्यंत पोहोचल्या असत्या तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने आग तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाईपसाठा उपलब्ध आहे, जर ही आग पसरली असती तर कोट्यवधींचे नुकसान झाले असते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत एम. पी. इंजिनिअरिंग कंपनीचे सुमारे २२ पाईप जळाले आहेत. दरम्यान, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
To Top