Pune Accident News l मद्यधुंद कारचालकाने ट्रॅव्हल्स चालकाला चिरडले, तर वाघोलीत भीषण अपघातात दाम्पत्य गंभीर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पुणे शहरात अपघातांचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर रस्ता ओलांडणारे ज्येष्ठ दाम्पत्य गंभीर जखमी झाले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून निष्पापांचा बळी घेण्याच्या घटनांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पहिली धक्कादायक घटना हडपसर-सासवड रोडवरील उरुळी देवाची परिसरात रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी) असे मृत पावलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. सागर सायकर आणि त्यांचे सहकारी विजय शिर्के दोन ट्रॅव्हल्स बस घेऊन अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, एका 'एर्टिगा' कारने त्यांना रस्ता न देता हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ट्रॅव्हल्स चालकांनी कार थांबवून विचारणा केली असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. लातूर) याने रागाच्या भरात सायकर यांच्या अंगावर गाडी घातली. सायकर कारच्या बोनेटवर पडले असतानाही चालकाने गाडी न थांबवता त्यांना काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर ते खाली पडल्यावर त्यांच्या अंगावरून गाडी घालून त्यांना चिरडले. 

दुसरी घटना वाघोली येथील मानकर डोसा हॉटेलसमोर घडली. रस्ता ओलांडत असलेल्या प्रकाश हणुमंतप्पा दुरुगोजी (वय ६५) आणि विद्यावती प्रकाश दुरुगोजी (वय ५६) या पती-पत्नीला एका भरधाव कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची मुलगी विजयश्री दुरुगोजी यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
To Top