सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. गेल्या दोन वर्षांपासून तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. या काळात पीडित मुलगी गर्भवती राहिली असता, आरोपीने तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. काही काळानंतर आरोपीने पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद, शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार घडले. पीडितेने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने विविध कारणे सांगून लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सिंहगड रोड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महिला पोलीस निरीक्षक रेश्मा साळुंखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहरात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांच्या वागण्याकडे आणि मित्रमंडळींकडे लक्ष देण्याचे, तसेच मुलींना अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
