Ambenali Ghat Accident l महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात : स्कॉर्पिओ १८०० फूट खोल दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
महाबळेश्वर : सचिन भिलारे 
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात सोमवारी (ता. २५) पहाटे भीषण अपघात होऊन प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात गाडीतील आठही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
रेस्क्यू टीम सदस्य सागर दाहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास स्थानिक प्रशासन आणि मदत पथकांना अपघाताची माहिती मिळाली. माहिती मिळताच ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था’, रेस्क्यू टीम आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घाटातील अंधार, खोल दरी आणि दुर्गम परिसरामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तरीही पथकांनी दरीत उतरून शोध व बचावकार्य सुरू केले.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओचा क्रमांक MH 11 DN 2340 असा असून, गाडीतील सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५) आणि नितीन किसन नायकोंडे (३५) यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण कोकणातील दापोली येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
To Top