सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
आपत्कालीन मदतसेवा असलेल्या डायल 112 क्रमांकावर खोटा दूरध्वनी करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका तरुणावर कराड तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतीश इंगळे (वय 20, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे 2026 रोजी रात्री 10.09 वाजण्याच्या सुमारास सतीश इंगळे याने डायल 112 या आपत्कालीन सेवेला फोन करून “मी खून केला आहे” अशी खोटी माहिती दिली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदार अमित पवार व परिविक्षाधीन अधिकारी चव्हाण यांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला.
चौकशीदरम्यान इंगळे याने मद्याच्या नशेत हा दूरध्वनी करून खोटी माहिती दिल्याची कबुली दिली. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महिंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार अमित पवार, शशिकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चिंचकर व राहुल बेडके यांनी ही कारवाई केली.
डायल 112 ही चोवीस तास सुरू असलेली अत्यावश्यक सेवा असून तिचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
