सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोऱ्यातील हातनोशी ता.भोर येथील शिवारात शेतकरी संजय पंढरीनाथ भिलारे शनिवार दि.२३ रोजी रात्रीच्यावेळी काम करत असताना अचानक बिबट्या शेताच्या बांधावरून समोर आल्याने शेतकऱ्याची भीतीने धावपळ उडाली.दरम्यान हातनोशी शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या वेळी शेतात ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने खत पांगवण्याचे काम सुरू असताना अचानक बिबट्या गावाशेजारील शिवारातील पिकांमधून अचानक समोर आला.यावेळी शेतकऱ्याची पूर्णतः बोलतीच बंद झाली होती.
मात्र ट्रॅक्टरवरील लाईटच्या उजेडाने बिबट्या शिवारातील पिकांमध्ये जाऊन लपून बसला. गावाशेजारील शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने याची माहिती गावातील शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांना सावध करण्यात आले. शेतात सध्या उन्हाळी पिके असून दिवसा बरोबरच रात्री उशिरापर्यंत शेतात काम करावे लागते.त्यातच बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाण्यास धजावत नाहीत.तर बिबट्या घरां शेजारूनही फिरायला लागला असल्याने वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी हातनोशी,गरुडवस्ती ता.भोर येथील शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
