सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
शेतकरी कुटुंबातून जागतिक सिनेविश्वात झेप घेतलेल्या बारामतीच्या अमोल भगत यांची प्रतिष्ठित La Boheme Cinema International Film Festival 2026 च्या ज्युरी सदस्यपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 3 डिसेंबर 2026 रोजी मॉस्को, रशिया येथे पार पडणार आहे.
अमोल भगत हे भारतीय फिल्ममेकर, मीडिया प्रोफेशनल तसेच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या नियुक्तीमुळे बारामतीसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा महोत्सव रशियातील राज्य-नोंदणीकृत फॅशन व सांस्कृतिक मीडिया प्लॅटफॉर्म La Boheme Cinema मार्फत आयोजित केला जातो. या प्लॅटफॉर्मवर महोत्सवाशी संबंधित अधिकृत बातम्या, लॉरिएट्स, शॉर्टलिस्ट आणि लॉंगलिस्ट प्रसिद्ध केल्या जातात. विशेष म्हणजे, La Boheme Cinema International Film Festival हा रशियन फेडरेशनच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या अधिकृत यादीत समाविष्ट आहे. La Boheme Cinema ला आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित रशियन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये FashionTV Russia कडून Fashion Summer Awards, Neva Fashion Week 2024 अंतर्गत “Fashion Film Festival” पुरस्कार तसेच RuPoR Public Relations Award मधील “Cultural and Educational Projects” विभागातील शॉर्टलिस्ट सन्मानाचा समावेश आहे.
अमोल भगत यांनी भारतीय चित्रपटसृष्टी, मीडिया प्रमोशन, फिल्म मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, La Boheme Cinema International Film Festival Russia 2026 हा त्यांचा ज्युरी सदस्य म्हणून 82 वा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल असून, ते आतापर्यंत 28 देशांमध्ये कार्यरत राहिले आहेत.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना अमोल भगत यांनी महोत्सवाच्या आयोजकांचे आभार मानत जागतिक स्तरावर सर्जनशील, आशयघन आणि स्वतंत्र सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करण्याची उत्सुकता व्यक्त केली.
दरम्यान, 2026 मधील या महोत्सवात विविध देशांतील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि चित्रपटप्रेमी सहभागी होणार असून सिनेमा, फॅशन आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागतिक सांस्कृतिक संवाद अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
