Petrol-Diesel l इराण-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मुंबई : प्रतिनिधी 
इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होताना दिसत आहे. देशभरात २५ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये तर डिझेलच्या दरात २.७१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळे आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतासह अनेक देशांवर दबाव वाढला आहे. भारताच्या तेल आयातीपैकी मोठा हिस्सा आखाती देशांमधून येत असल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 
इंधन दरवाढीमुळे वाहतूक, शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सततच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक स्तरावरही होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत करण्यासाठी विविध देशांकडून प्रयत्न सुरू असून इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. 

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
To Top