सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील कोदवडी फाटा येथे पूर्ववैमनस्यातून हॉटेल व्यावसायिक व वेटरवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिस्टलमधून गोळीबार करत कोयत्याने वार करून दोघांना गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी हॉटेलमध्ये जेवण न दिल्याच्या कारणाचा राग मनात धरून आरोपी गणेश धरपाळे (रा. वांजळे) याने आपल्या चार अनोळखी साथीदारांसह शनिवारी (दि. २४) रात्री कोदवडी फाटा येथील हॉटेलमध्ये धाड टाकली. त्या वेळी हॉटेल चालक मस्कु तानाजी दसवडकर, त्यांची पत्नी तसेच वेटर दशरथ शिळीमकर व त्यांची पत्नी हॉटेलमध्ये उपस्थित होते.
यावेळी आरोपी गणेश धरपाळे याने डाव्या हातातील पिस्टलमधून मस्कु दसवडकर व वेटर दशरथ शिळीमकर यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. त्यानंतर हातातील कोयत्याने दसवडकर यांच्या डाव्या मांडीच्या मागील बाजूस व कपाळावर वार करून जखमी केले. तसेच वेटर दशरथ शिळीमकर यांच्या डाव्या जबड्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
हल्ल्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्या व फ्रिजची तोडफोड केली. तसेच हॉटेलसमोर उभी असलेली एमएच १२ एमजी ३७५७ क्रमांकाची मोपेड दुचाकी लाथ मारून पाडत नुकसान केले.
या प्रकरणी मस्कु तानाजी दसवडकर (वय ४१) यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी मस्कु दसवडकर व दशरथ शिळीमकर यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरोपी गणेश धरपाळे व त्याच्या चार अनोळखी साथीदारांचा शोध घेण्यासाठी वेल्हे पोलिसांनी पथके तयार केली आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमित देशमुख पुढील तपास करीत आहेत.
