Pune News l मोठी बातमी..! पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू : 'या' तारखेपर्यंत मोर्चे, सभा आणि गर्दीवर निर्बंध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांनी २६ मे २०२६ रोजी रात्री १ वाजल्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हे आदेश ८ जूनपर्यंत प्रभावी राहणार असून, या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे निर्माण होणारी संभाव्य अस्वस्थता तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, रॅली, धरणे किंवा सार्वजनिक सभा घेण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. परवानगीशिवाय आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय तलवारी, लाठ्या, दगड, स्फोटके किंवा इतर कोणतीही घातक हत्यारे बाळगण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. 
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलनांची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याचवेळी आगामी धार्मिक सण, उत्सव आणि मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले असून, अफवा किंवा भडकावू संदेशांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, अत्यावश्यक सेवा, शासकीय कामकाज, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा तसेच पूर्वपरवानगी घेतलेले कार्यक्रम यांना या आदेशातून काही प्रमाणात सूट देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
To Top