सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चार गुन्ह्यांतील चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार यशवंत पवार यांना गोपनीय माहिती मिळाली. एका इसमाकडे चोरीच्या मोटारसायकली असून त्या विविध ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून ऋषिकेश पिंटू मंडले (रा. निरजणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीसोबत एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकाचाही सहभाग असल्याचे उघड झाले. आरोपीने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या वाहनांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत चोरीची वाहने हस्तगत केली. या कारवाईत बारामती शहर पोलीस स्टेशनसह बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दोन तसेच सोलापूर ग्रामीणमधील वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक अशा एकूण चार गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये यामाहा RXG, हिरो होंडा स्प्लेंडर, यामाहा कंपनीची आणखी एक मोटारसायकल तसेच होंडा अॅक्टिवा स्कुटीचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली अक्षय सिताफ, रामचंद्र शिंदे, अमोल देवकाते, गिरीश नेवसे, पोपट कवितके, विशाल शिंदे, सागर जामदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने राबवली. तपासाचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांनी केले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्यांवर प्रभावी वचक बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना वाहन पार्क करताना योग्य लॉकचा वापर करावा, सुरक्षित ठिकाणीच वाहन उभे करावे तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
