सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
जेजुरीच्या माजी आदर्श नगराध्यक्षा अमृता संदिप घोणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमार्फत “बँकिंग आणि वित्त“ या अभ्यास मंडळातून विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी संपादन केली आहे. “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वित्तीय कामगिरी आणि समस्यांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.
हे संशोधन एम.एम.सी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ.डि.वाय.पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे या संशोधन केंद्रातून पूर्ण करण्यात आले. ह्या संशोधन कार्यादरम्यान त्यांनी आपल्या विषयाशी संबंधित एकूण ९ संशोधन पत्रे आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर सादर करून प्रसिद्ध केली आहेत. प्रा.सौ. अमृता संदिप घोणे या जेजुरीच्या माजी नगराध्यक्ष असून,महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान वर विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित दादा) प्रदेश संघटक सचिव म्हणून राज्य कार्यकारणीवर कार्यरत आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पक्ष निरीक्षक म्हणूनही त्या कार्यरत आहेत.आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीसाठी सुद्धा त्या राज्यभर विशेष ओळखल्या जातात. राजकीय,सामाजिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळत असतानाही त्यांनी शिक्षणाची ओढ जपली. लग्नाआधी फार्मासिस्ट असणाऱ्या सौ. घोणे यांनी लग्नानंतर बी.कॉम. व नंतर एम.कॉम. पदवी घेतली , पहिल्याच प्रयत्नात SET परीक्षा उत्तीर्ण, जीडीसी अँड ए परीक्षा उत्तीर्ण ,सज्जनगड विद्यापीठाची दासबोध ग्रंथावर आधारित परिचय,प्रबोध व पारंगत ही पदवी आणि आता विद्यावाचस्पती (पीएच.डी).ही पदवी संपादन करून उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळवले आहे.
राजकीय, सामाजिक,धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एकाच वेळी उत्तुंग यश संपादन करणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब असून त्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.यामुळे परिसरातून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
या यशस्वी प्रेरणेमागे शाहु, फुले आंबेडकर यांची सुधारणावादी विचारधारा हि मार्गदर्शक ठरली असे त्यांनी सांगितले. शिकण्याची आवड निर्माण करणारे आपले वडील श्री. अनिल ज्ञानेश्वर कांबळे यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. तसेच या यशस्वी शैक्षणिक व राजकीय प्रवासात त्यांना त्यांचे पती श्री. संदीप अशोकराव घोणे (मा. अध्यक्ष, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट,जेजुरी) यांचा मोलाचा पाठिंबा व प्रोत्साहन व सतत मिळणारा आधार हेच त्यांच्या यशामागील महत्त्वाचे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय,सामाजिक व धार्मिक संस्थांशी जोडलेला त्यांचा घोणे परिवार व वेळोवेळी निरपेक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व हितचितंकांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत .
