Baramati Crime l नदीत उडी..! उसाच्या फडात लपला… तरीही अखेर जेरबंद ! १५ गुन्ह्यांतील फरार आरोपीला बारामती पोलिसांनी केले जेरबंद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती) याला अखेर बारामती शहर पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केले. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देणारा हा आरोपी पोलिसांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकला.
बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असून, त्याच्यावर १५ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. न्यायालयाकडून वारंवार समन्स, नोटिसा आणि वॉरंट बजावूनही आरोपी सुनावणीस गैरहजर राहत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
२४ मे २०२६ रोजी सकाळी बारामती शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी दशविधी कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती मिळताच पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि पोलीस शिपाई वैभव मदने यांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग सुरू ठेवला. नदीतून बाहेर पडत आरोपी जवळील दाट उसाच्या फडात लपला. उंच उसाचे पीक आणि अरुंद पायवाटांमुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत असतानाही पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू ठेवली.

सुमारे दीड तास चाललेल्या या थरारक कारवाईनंतर उसामध्ये संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी आरोपीला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. अनेक वर्षे पोलिस आणि न्यायालयाला चकवा देणारा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांसमोर निष्प्रभ ठरला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली. या धाडसी कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
या कारवाईत महिला पोलीस हवालदार सगुना आवटे आणि पोलीस हवालदार उमा कोकरे यांनी न्यायालयीन प्रक्रिया, वॉरंट अंमलबजावणी आणि आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
To Top