सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात अनेक वर्षांपासून रस्त्यांवर पडून असलेल्या बिनधनी व बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७३९ वाहनांचा ई-लिलाव केला आहे. या लिलावातून शासनाच्या तिजोरीत ५० लाख १० हजार १२८ रुपये जमा होणार असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशान्वये शहरातील बेवारस वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत वाहतूक शाखेअंतर्गत ११ पोलीस ठाण्यांकडील ३६६ आणि वाहतूक शाखेकडील ३७३ अशी एकूण ७३९ वाहने जप्त करून त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
शहरातील विविध रस्त्यांवर अनेक वर्षांपासून उभी असलेली वाहने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती. वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, रस्ते अरुंद होणे आणि वाहतुकीचा वेग मंदावणे अशा समस्या वाढत असल्याने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखेकडून बेवारस वाहनांची माहिती संकलित करून ती वाहने सुरक्षित ठिकाणी जमा करण्यात आली. वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रसिद्धी देण्यात आली तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहनांचे मूल्यांकन करण्यात आले. ज्या वाहनांचे मालक उपलब्ध झाले त्यांना त्यांची वाहने परत देण्यात आली. मात्र मालक न मिळालेल्या वाहनांबाबत न्यायालयाकडून नाश करण्याचे आदेश प्राप्त करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८७ अन्वये काही वाहनांच्या लिलावास अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यानुसार मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र शासन संलग्न संस्थेमार्फत २० मे रोजी ई-लिलाव प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, शहरातील बेवारस वाहनांची समस्या कमी करण्यासाठी पुढेही अशाच मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी रस्त्यांवर दीर्घकाळ बेवारस स्थितीत उभी असलेली वाहने अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांची माहिती पीटीपी अॅपद्वारे वाहतूक विभागाला कळवावी, असे आवाहनही डॉ. भाजीभाकरे यांनी केले.
