सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे (ता. बारामती) येथे थोरल्या भावाने बनावट प्रतिज्ञापत्र आणि शासकीय गॅझेटच्या आधारे धाकट्या भावाची शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नामदेव एकनाथ पिलाणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत धाकटे बंधू बापूराव उर्फ तुळशीराम एकनाथ पिलाणे (रा. लपतळवाडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलाणे कुटुंबाने करंजे येथील गट क्रमांक २९२ मधील ३ हेक्टर ६९ आर जमीन हणुमंत एकनाथ पिलाणे आणि बापूराव पिलाणे या दोघांच्या नावाने खरेदी केली होती.
दरम्यान, बापूराव यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते लपतळवाडी येथे राहत होते. याचाच फायदा घेत नामदेव पिलाणे यांनी “बापूराव आणि मी एकच व्यक्ती आहे” असा बनाव रचल्याचा आरोप आहे. जानेवारी २००९ मध्ये त्यांनी बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून त्याआधारे शासकीय गॅझेट करून घेतले. त्यानंतर महसूल विभागाकडे खोटा अर्ज व जबाब सादर करून सातबारावर ‘बापूराव’ऐवजी ‘नामदेव’ अशी नोंद दुरुस्त करण्यात आली. कौटुंबिक वादातून हा प्रकार अलीकडे उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.
मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तक्रारीनुसार, ३० जुलै २००९ रोजी नामदेव पिलाणे यांनी बनावट गॅझेट तलाठ्यांकडे सादर केले होते. त्यावेळी अर्ज आणि जबाबाची कोणतीही पडताळणी न करता महसूल विभागाने गट क्रमांक २४२ ऐवजी २९२ मध्ये नाव दुरुस्तीची नोंद केली. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
