Baramati Crime News l शरीर क्षमता वाढविण्याच्या नावाखाली मृत्यूचा खेळ? बारामतीत ‘टर्मिन’ इंजेक्शनचे रॅकेट उघड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
शरीर क्षमता वाढविण्याच्या नावाखाली तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर “टर्मिन” इंजेक्शन विक्री रॅकेटवर बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत १०० इंजेक्शनसह एका आरोपीला अटक केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, १२५, २७८ तसेच औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० मधील कलम १८(C), १८(A)(VI), २७(D), २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना २३ मे रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, एमईसीबी कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड परिसरात एक युवक संशयास्पद इंजेक्शन साठ्यासह फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अॅक्टीव्हा स्कुटीवर बसलेल्या गौरव बाळासो जाधव (वय २४, रा. आमराई, बारामती) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याची व वाहनाची झडती घेण्यात आली.
स्कुटीच्या डिकीतून “MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP” अर्थात “टर्मिन” नावाने ओळखली जाणारी १०० सिलबंद इंजेक्शन्स आढळून आली. या इंजेक्शनची बाजारातील किंमत ३३ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीची अॅक्टीव्हा स्कुटी जप्त करण्यात आली. पोलिस तपासात आरोपीकडे औषध खरेदीचे कोणतेही वैध बिल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अथवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. ही इंजेक्शन्स जिम व बॉडी बिल्डिंग करणाऱ्या युवकांना शारीरिक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येकी सुमारे ५०० रुपयांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
              औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP” हे Schedule-H प्रवर्गातील औषध असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. या औषधाचा मूळ वापर लो ब्लड प्रेशरच्या उपचारासाठी केला जातो. मात्र, शरीर क्षमता वाढविण्यासाठी त्याचा गैरवापर होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या इंजेक्शनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास झोप येणे, भास होणे, झटके येणे, हृदयाचे ठोके मंदावणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशाराही औषध निरीक्षकांनी दिला आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून इंजेक्शन पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, संबंधित जिम नेटवर्क व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
To Top