Baramati News l निंबुत येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी; 'आदर्श मिलिंद तरुण मंडळा'चा स्तुत्य उपक्रम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
निंबुत : प्रतिनिधी 
'अप्प दीपो भव'चा प्रेरणादायी संदेश देत, निंबुत येथे आदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा व भगवान बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
         कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली. निवृत्त पोलीस निरीक्षक भानुदास बनसोडे व मायावती बनसोडे यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शशिकांत बनसोडे यांनी उपस्थितांकडून पंचशील ग्रहण करून घेत सुत्त पठण केले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसाद सोनवणे म्हणाले की, "भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी म्हणजे भगवान बुद्ध होय. त्यांनी केवळ धम्म दिला नाही, तर सत्य, करुणा, समता आणि विवेकाचा प्रकाश दिला. बुद्धांचा धम्म हा डोळस विचार, मुक्त चिकित्सा आणि शुद्ध मानवतेचा मार्ग आहे. माजी सरपंच राजकुमार बनसोडे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना जीवनात विवेक जागृत करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जीवनात अहंकाराऐवजी नम्रता, द्वेषाऐवजी मैत्री आणि अंधश्रद्धेऐवजी विवेकाची कास धरली पाहिजे. 'अप्प दीपो भव' म्हणजेच स्वतःच स्वतःचा प्रकाश बना, हा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे.

जयंतीनिमित्त सायंकाळी आदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे (अन्नदान) आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला निंबुत परिसरातील बौद्ध उपासक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top