Baramati News l रात्रीची लाईट द्या..! अन्यथा नीरा-बारामती रस्ता रोखणार : वाणेवाडी-मुरूमचे ग्रामस्थ आक्रमक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
मुरूम, वाणेवाडीसह परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार आणि अघोषित लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. निवडणुकीपुरता वीजपुरवठा सुरळीत ठेवून मतदान प्रक्रिया पार पडताच पुन्हा भारनियमन सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, यामुळे परिसरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारनियमन बंद करा अन्यथा नीरा बारामती रस्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे। 
                
          महावितरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दोन्ही गावांतील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. मुरूम आणि वाणेवाडी गावांमधून दरमहा मोठ्या प्रमाणावर वीजबिलाचा भरणा केला जात असतानाही या भागाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावठाण फिडरचे काम संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आले असले तरी ते अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संथ गतीने सुरू असलेल्या या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अति लोडशेडिंगचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. ऐन उन्हाळ्यात शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच स्थानिक लघुउद्योग आणि दैनंदिन व्यवहार ठप्प होत असून वारंवार वीज खंडित होत असल्याने महागडी विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळेस तासनतास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने परिसरात चोरीचे भय आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

समस्यांची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक लक्ष्मण गोफणे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, मुरूमचे सरपंच नंदकुमार शिंगटे,मा. उपसरपंच निलेश शिंदे, फत्तेसिंह चव्हाण, माऊली कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. १५ मेपर्यंत गावठाण फिडरचे काम पूर्ण करून भारनियमन बंद न केल्यास होणाऱ्या तीव्र आंदोलनाला आणि उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
To Top