सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी पीएच.डी. पदवी पुरंदरचे सुपुत्र नितीन कुलकर्णी यांनी यशस्वीरित्या संपादन केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, पुणे येथून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले.
त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांना आता 'डॉ. नितीन कुलकर्णी' म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे. संशोधनाचा विषय: बिझनेस स्कूल्स आणि उद्योजकता डॉ. कुलकर्णी यांनी “एमबीए विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकसित करण्यामध्ये बिझनेस स्कूल्सची भूमिका — एक अभ्यास” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी न घेता विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची कौशल्ये कशी रुजवता येतील, यात व्यवस्थापन संस्थांची (B-Schools) भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा सखोल अभ्यास त्यांनी या संशोधनातून मांडला आहे. विशेषतः अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण यांचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासला आहे. या संशोधन कार्यासाठी डॉ. नितीन कुलकर्णी यांना डॉ. मीता मेश्राम यांनी संशोधन मार्गदर्शक (Guide) म्हणून मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रेरणा दिली.
तसेच नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद दादास आणि रिसर्च सेंटर प्रमुख डॉ. विकास डोले यांचेही त्यांना उत्तम सहकार्य लाभले. या प्रवासात त्यांना डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. ई. बी. खेडकर तसेच त्यांच्या संस्थेतील सहकारी आणि हितचिंतकांचे वेळोवेळी पाठबळ मिळाले.
ग्रामीण भागातून येऊन शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे डॉ. नितीन कुलकर्णी यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
