Beed Crime News | उसाला पाणी देत असताना 30 वर्षीय विवाहितेवर अत्याचार; आरोपीवर बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बीड : प्रतिनिधी 
केज तालुक्यातील एका गावात उसाच्या शेतात पाणी देत असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून केज पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे कुटुंब बटईने शेती करत असून शेतात उसाचे पीक आहे. महिलेचे सासरे आजारी असल्याने त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे महिलेचे पती व सासू रुग्णालयात थांबले होते. दरम्यान, 21 एप्रिल रोजी पीडित महिला एकटीच उसाच्या शेतात पाणी देत होती. यावेळी आरोपी आसाराम रंगनाथ जाधव (रा. जाधवजवळा, ता. केज) हा तेथे आला. “काय करीत आहेस?” असे म्हणत त्याने महिलेचा हात पकडून तिला उसाच्या पिकात ओढून नेले. महिलेने आरडाओरडा केला, मात्र परिसरात कोणी नसल्याने मदत मिळू शकली नाही. त्यानंतर आरोपीने “तू मला आवडतेस” असे म्हणत महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिल्याने महिला भीतीपोटी गप्प राहिली. मात्र, काही दिवसांनी आरोपी महिलेच्या घरासमोरून वाहन घेऊन जात असताना वारंवार हॉर्न वाजवत होता. 

त्यामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर पतीला संपूर्ण घटना सांगितली. यानंतर पीडितेच्या पतीने आरोपीकडे जाऊन जाब विचारला असता, आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत “तुला काय करायचे ते कर” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी 7 मे रोजी रात्री पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी आसाराम रंगनाथ जाधव याच्याविरुद्ध बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे पुढील तपास करीत आहेत.
To Top