सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात दोन वेगवेगळ्या धक्कादायक घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत विवाहित महिलेने पतीच्या डोळ्यादेखत आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी कॅब चालकाला अटक केली आहे.
पुण्यातील कातवी परिसरातील विटीपी अर्बन लाइफ सोसायटीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. प्रतिभा मनीष शंकर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रतिभा अचानक फ्लॅटच्या बाल्कनीकडे धावत गेली आणि आठव्या मजल्यावरून उडी घेतली. यावेळी तिच्या पतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न करत हात पकडला होता. मात्र काही क्षणातच तिचा हात सुटला आणि ती खाली कोसळली. घटनेनंतर सोसायटी परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत प्रतिभाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रतिभाला तीन अपत्ये असून या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, पुण्यातील केशवनगर परिसरात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कचरा डेपो रोडलगत एका तरुणीचा गळा दाबून खून करून मृतदेह फेकून दिल्याप्रकरणी गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गोरखनाथ देवराम शिंदे (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्या कॅब चालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून ती ब्युटीपार्लर व्यवसाय चालवत होती. पोलिस तपासात पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
